॥ जय श्रीराम ॥
आई गेल्यानंतर श्रीमहाराज आयोध्येहून इंदूर , नाशिक येथे मुक्काम करून गोंदवल्यास परतले. येव्हाना श्रीमहाराजांना गोंदवले सोडून एक वर्षांच्यावर काळ लोटला होता. गीताबाईंची आठवण सर्व गावाला होत होती.
सन १८९६ उजाडले पुन्हा दुष्काळ. परंतू पूर्वीच्या दुष्काळापेक्षा याची तीव्रता कमी होती. काशीहून परत आल्यावर लगेचच शेतीतील कामे काढून श्रीमहाराजांनी लोकांना खायला घातले मागील दुष्काळा प्रमाणॆ यावेळीही जे लोंक शेतात कामाला येत त्यांना एक वेळचे अन्न मोफत दिले जाई. तसेच मंदिरात रोज दहाहजार जप करणारास अन्न मोफत दिले जाई. याच काळात गाईंसाठी श्रीमहाराजांनी एक गोशाळा बांधली.
सरते शेवटी सन १८९७ च्या मध्यात दुष्काळाची तीव्रता संपून लोकांना स्वस्थता वाटू लागली. एप्रिल महिना होता. ऎके दिवशी सकाळी श्रीमहाराज भजन करण्यास उभे राहिले. थोड्याच अवधीत बरीचशी मंडळी जमा झाली मग श्रीमहाराजांनी निरूपण सांगण्यासही प्रारंभ केला. होता होता दोन तास लोटले सर्व श्रोते तल्लीन होऊन भजन व निरूपण ऎकत होते. इतक्यांत श्रीमहाराज खालील अभंग पुन्हा पुन्हा म्हणू लागले.
त्रेपन्न वर्षे भूमीभार । आतां पाहूं आपले घर ॥
देहमर्यादा सरली । मागें भक्ति करा भली ॥
तुम्हां सांगितल्या खुणा । विसरू देऊं नका मना ॥
दीनदास आनंदला । राम बोलावितो मला ॥
अभंगात तल्लीन झालेले सर्व लोक भानावर आले. श्रीमहाराजांनी अभंग संपवून निरूपणाची सांगता केली व उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले ” मी आज गोंदवले सोडून नैमिषारण्यात जाणार आहे. आपण कसे वागावे हे मी सांगितले आहेच. कोणीही रामाला विसरू नये. सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काल व्यतित करावा.” हे ऎकून सर्व उपस्थित रडू लागले. श्रीमहाराजांना न जाण्याबद्दल विअनवू लागले. परंतू श्रीमहाराजांनी जाण्याचा निश्चय केला होता. सर्व लोंक अक्रोश करू लागले, श्रीमहाराजांच्या पायावर लोळण घेवू लागेले परंतू श्रीमहाराज कोणसही बधले नाहीत. शेवटी निघताना श्रीमहाराज रामरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले रामास सर्वांची काळजी घेण्यास सांगून श्रीमहाराज मंदिराच्या बाहेर पडले तेंव्हा प्रचंड जनसमुदाय शोकाकूल वातावरणात श्रीमहाराजांच्या मागे लोटला. भर दुपारची वेळ होती. गोंदवल्याचा प्राण चालला हे पाहून लोकांच्या दु:खास पारवार उरला नाही. प्रत्येकजण रडण्यापलिकडॆ काही करू शकत नव्हते. शेवटी श्रीमहाराज टांग्यात बसून जाऊ लागले. साश्रूनयनांसह सर्वजण श्रीमहाराजांना निरोप देवू लागला. टांगा हलताच सर्वांनी एकच टाहो फोडला. इतक्यात मंदिरातून एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावी लागला. त्याला पहाताच श्रीमहाराजांनी टांगा थांबविण्यास सांगितले. त्यास मागे येण्याचे कारण विचारताच प्रचंड घाबरल्या स्वरात तो माणूस म्हणाला ” महाराज , राम, सीता व लक्ष्मण यांच्या डॊळ्यातून सारखे अश्रू वाहत आहेत. ” लगेच श्रीमहाराज मंदिरात गेले.रामरायाच्या गालावरील अश्रू पुसताच पुन्हा अश्रूंच्या धारा येवू लागल्या. श्रीमहाराजांचे डॊळेसुद्धा पानावले रामरायास ते म्हणाले ” मी निघून जाणार म्हणून का तू रडतोस ? तुझीच इच्छा नसेल तर मी जाऊन तरी काय करावे.? ” श्रीमहाराज जाणार नाहित हे कळल्यावर शोकसागरात बुडालेला जनसमुदाय एकदम शांत झाला. वातवरणात प्रसन्नता आली. श्रीमहाराजांनी मग पुन्हा स्नान करून श्रीरामरायास नैवेद्य दाखविला.
॥ श्रीराम समर्थ ॥
प्रतिक्रिया व्यक्त करा