॥ जय श्री राम ॥
भिकाजी श्रीपत नांवाचे एक फौजदार होते. श्रीमहाराजांच्यावर त्यांची विशेष अशी निष्ठा होती. या भिकाजीपंताजवळ बत्ताशा नावाचा एक पांढरा शुभ्र, सुंदर पण थोडा मस्त असा घोडा होता. तो घोड भिकाजीपंतांनी श्रीमहाराजांना अर्पण केला. घोडा उमदा असला तरी अत्यंत खट्याळ होता. इतरांना तो अजीबात दाद देत नसे. उलट श्रीमहाराजांच्यावर त्याचे विलक्षण प्रेम असे. दर एक दोन दिवसांनी श्रीमहाराज त्याच्याजवळ जात, त्याच्याशी बोलत आणि पुष्कळवेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणत. बत्ताशा श्रीमहाराजां व्यतिरीक्त इतरांना त्याच्यावर अजीबात बसू देत नसे. शाहूराव चिवटे नांवाचे श्रीमहाराजांचे एक शिष्य, एक दिवस श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. बत्ताशाला पाहून त्यांनी श्रीमहाराजांकडे बत्ताशाची मागणी केली. श्रीमहाराजांनी लगेचच बत्ताशा येत असल्यास, त्याला घेवून जाण्यास सांगीतले. श्रीमहाराजांनीच परवानगी दिल्यामूळे शाहूरावांनी बत्ताशास जबरदस्तीने घरी नेले.परंतू त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने तीन दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्यालाही शिवला नाही; इतकेच नाही तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. हा प्रकार पाहून चिवट्यांनी बत्ताशाला गोंदवल्यास परत आणून श्रीमहाराजांच्या स्वाधीन केले. श्रीमहाराजांना पाहताच बत्ताशा फुरफुरू लागला. श्रीमहाराजांनी त्याला चारा खावू घातला व पाणी पाजले. तीन दिवसांनी बत्ताशाने श्रीमहाराजांच्या हाताने अन्न खाल्ले. या दिवसानंतर गोंदवल्यातील लोक बत्ताशाला पूज्य मानू लागले. ( याच बत्ताशाचे शिल्प गोंदवल्यात पहावयास मिळते.)
श्रीमहाराजांचा व्याप झपाट्याने वाढत होता. नुसत्या दर्शनाला येणा-या मंडळींची संख्या तर जास्त वाढलीच पण बाहेर गावाहून येणा-या ब-याच मंडळींना श्रीमहाराज स्वत: बरेच दिवस गोंदवल्यात ठेवून घेवू लागले. त्यामूळे अर्थात थोरले राम मंदिर अपूरे पडू लागले. म्हणून श्रीमहाराजांनी धाकटे राम मंदिर बांधले. तसेच लोकांना विशेषत: सहकुटुंब येणा-यांना उतरण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्या देखील बांधल्या. आपले कुलोपाध्याय चिंतुबुवा यांना गोंदवल्यास आणून जागा दिली आणि एक शेतपण उत्पन्नासाठी दिले.
गोंदवल्यात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. येणा-यांची सर्व सोय करण्यासाठी पैशाची आवश्यकता भासू लागली. त्यामूळे श्रीमहाराजांनी घरच्या शेतीची वाढ केली सर्व जमीन साफ करून खत वगैरे घालून चांगली तयार केली. शेतीत नविन विहीर बांधली. नवीन जमीन विकत घेतली आणि ती रामाच्या खर्चाला लावून दिली. य काळांत पुष्कळ वेळा श्रीमहाराज स्वत: शेतामध्ये नांगर हांकणे, खडेगोटे काढणॆ, हरळी उपटणॆ इ. कामे करीत. खुद्द श्रीमहाराजच काम करताना बघून मग गरीब –श्रीमंत , लहान- मोठे, स्त्री- पुरूष सर्वजण काम करीत. जेवायला रोज बाजरीची भाकरी व भारी तिखट आमटी असायची. भात फक्त सणावारी मिळायचा तरी देखील श्रीमहाराजांच्या प्रेमासाठी लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, विद्वान- अडाणी, स्त्री-पुरूष सर्वजण मोठ्या आनंदाने कष्ट करीत आणि जे मिळेल ते आनंदाने पोटभर खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास रहात.
॥ श्रीराम समर्थ ॥


॥ प्रतिक्रिया ॥