
॥ जय श्री राम ॥
आयोध्येहून परतल्यावर श्रीमहाराजांनी गोंदवल्यास काही काळ राहण्याचे ठरविले. सन १८७६ -७७ या साली श्रीमहाराज गोंदवले सोडून कोठेही बाहेर गेले नाहीत. याच सुमारास संपूर्ण हिंदुस्थानात सर्वत्र दुष्काळ पडला होता. त्यावेळी ब्रिटीश सरकारने थोडी फार दुष्काळी कामे सुरु केली. तरीही लोकांची उपासमार थांबेना तेंव्हा श्रीमहाराजांनी गोंदवल्यास आपल्या शेतामध्ये दुष्काळी काम सुरु केले. जवळजवळ दिडशे बैलगाड्या कामावर लागल्या. कामाच्या मोबदल्यात प्रत्येक माणसाला एक भाकरी व एक भांडे भरुन आमटी श्रीमहाराज स्वत: देत. गोंदवल्यातील माणसांबरोबर शेजारील गावातील लोकही कामावर येवू लागले. रोज सुमारें दिडहजार मनुष्य जेवून तृप्त होऊन जात.
तो पारतंत्र्याच काळ होता. ब्रिटिशांच्या विरुध्द बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आपल्या कार्यास सत्पुरुषांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांकडे, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीमाणिकप्रभु यांचे कडे जावून आले.परंतू कोणीही त्यांच्या कार्यास सहमती दर्शविली नाही. बंडाची सर्व तयारी झाल्या नंतर ते श्रीमहाराजांना भेटावयास गोंदवल्यास आले. श्रीमहाराजांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही. अजून अनुकुल काळ आला नाही. शक्ति वाया न घालता भगवंताची उपासना करण्याबद्दल सांगूनही वासूदेव बळवंत फडके काहीही न ऎकता तडक पुण्यास निघून गेले.पुढे थोड्याच दिवसात सन १८७९ च्या सुमारास ब्रिटीश सरकारने त्यांना पकडले. त्या नंतर सन १८८३ साली त्या थोर आद्य क्रांतिकारकाचे एडनच्या तुरुंगात प्राणोत्क्रम झाले.
साधारण याच सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. गीताबाईंना याचा फार आनंद झाला.त्या आपल्या सूनेचे कौतुक करण्यात गढून गेल्या. नऊ महिने पूर्ण होताच. सरस्वतीने एका गोंडस बाळास जन्म दिला. आपल्या नातवाचे बारसे मोठ्या थाटात करावे अशी गीताबाईंची फार ईच्छा होती. परंतू श्रीमहाराजांनी बारसेच करण्याचे टाळले. सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. पण सरस्वती मात्र येणारे भवितव्य ओळखून होती. एक वर्षाच्या आतच तो मुलगा मरण पावला.
त्यानंतर थोड्याच दिवसांत तापाचे निमित्त होऊन सरस्वतीने जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या निधनानंतर श्रीमहाराज इंदूरला निघून गेले. इकडे गोंदवल्यास रावजींचे निधन झाले. गीताबाईंना फार दु:ख झाले. श्रीमहाराजही गोंदवल्यास नव्हते. परंतू श्रीमहाराजांनी तिकडे रावजी गेल्याचे ओळखले व बरोबर दहाव्या दिवशी श्रीमहाराज गोंदवल्यास परतले. गोंदवल्यास आल्यानंतर आपल्या पित्याची उत्तरक्रिया पार पाडून आईचे दु:ख हलके केले.
चार-पाच महिन्यांच कालावधी लोटल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील रिवाजाप्रमाणे श्रीमहाराजांना मुली सांगून येंवू लागल्या. श्रीमहाराजांचे वय त्यावेळी साधारण ३०-३२ च्या आसपास होते. गीताबाईंनी श्रीमहाराजांकडे लग्ना बद्दल विषय काढला. श्रीमहाराजांनी मुलगी स्वत: पसंत करण्याच्या अटीवर त्यास संमती दर्शविली.
गोंदवल्यापासून जवळच आटपाडी नावाच्या गावात देशपांडे नावाचे एक सुखवस्तु गृहस्थ रहात होते. त्यांना पाच मुली होत्या. त्यापैकी यमुना नावाची एक मुलगी जन्मांध होती. एक दिवस श्रीमहाराज अचानक आटपाडीला देशपांड्यांच्या घरी आले व त्या अंध मुलीला लग्नाची मागणी घातली. श्रीमहाराजांसारखा जावई मिळाल्याबद्दल सखारामपंताना खूप आनंद झाला.मग एक दिवस श्रीमहाराज एकटे आटपाडीला जावून लग्न करुन आले.गीताबाईंना अंध सून बघून हसावे की रडावे ते कळेचना परंतू झाले ते झाले म्हणून त्या सूनेचे कौतुक करु लागल्या. यमुनाचे माहेरचे नाव बदलून पुन्हा सरस्वती ठेवण्यात आले. ( गोंदवल्यात समाधि मंदिराच्या शेजारीच आईसाहेबांचे मंदिर आहे.)
// श्रीराम समर्थ //

॥ प्रतिक्रिया ॥