
॥ जय श्री राम ॥
श्रीमहाराज, वैराग्याच्या वेषभूषेचा त्याग करुन गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर प्रपंच खूप छान चालवू लागले. ते बघून त्यांच्या आईंना खूप आनंद झाला. असेच काही दिवस गेल्यानंतर गीताबाईंनी श्रीमहाराजांजवळ कुलकर्णीपद संभाळण्याबद्दल विषय काढला. रावजी देखील आता खूप थकले होते त्यांना देखील विश्रांति मिळेल म्हणून श्रीमहाराजांनी लगेच होकार देऊन कुलकर्णीपदाचा स्विकार केला
श्रीमहाराज कुलकर्णीपद इतक्या अप्रतिमपणे संभाळू लागले कि, गोंदवल्यातील लोक आश्चर्य व्यक्त करित.आता श्रीमहाराजांकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गावातील लोक सुखी झाले.
परंतु श्रीमहाराजांचे मन त्यात लागेना. कुलकर्णीपद संभाळून पुरते चार महिने झाले नाही तो एक दिवस श्रीमहाराजांनी गीताबाईंना याबद्दल सांगून सद्गुरू श्रीतुकारामचैतन्यांना भेटावयास जाण्याची परवानगी मागीतली. याच सुमारास श्रीमहाराजांची भेट भाऊसाहेब केतकरांशी झाली. हेच भाऊसाहेब पुढे श्रीमहाराजांचे परम शिष्यांपैकी एक होत. सद्गुरूंच्या दर्शनाला जाताना गीताबाईंनी श्रीमहाराजांना त्यांच्या पत्नी सरस्वतीला घेऊन जाण्यास सांगितले. श्रीमहाराज श्रीतुकारामचैतन्यांच्या अनेक गोष्टी सांगत त्या ऎकून आपणही त्यांचे येहेळगावी जावून दर्शन घ्यावे असे सरस्वतीला अनेकदा वाटे. ऎके दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीमहाराज अचानक येहेळेगावी जाण्यास निघाले. सरस्वतीदेखील त्यांच्या पाठीमागे तशीच निघाली. श्रीमहाराज तिच्यावर रागावले कि ती गप्प बसे. श्रीमहाराज मुद्दमच वेगाने पळू लागत तरीही सरस्वती धीटपणे त्यांच्या मागोमाग चालतच राहिली. शेवटी तिच्या निर्भयपणाच कौतुक करत श्रीमहाराजांनी तिला आपल्या सोबत येहेळेगावी नेले.
ठिकठिकाणी मुक्काम करीत श्रीमहाराज आपल्या पत्नीला बरोबर घेवून येहेळेगावी पोहोचले. श्रीतुकारामचैतन्य त्यावेळी घरीच बसले होते. त्या दोहोंना पाहून श्रीतुकारामचैतन्यांना खूप आनंद झाला. त्यांना आठ दिवस ठेवून घेवून श्रीतुकारामचैतन्यांनी आपल्या सूनेचे मोठे कौतुक केले. सद्गुरूंच्या सहवासात आठ दिवस कसे गेले ते कळलेच नाही. येहेळेगावातून निघताना श्रीमहाराजांनी श्रीतुकारामचैतन्यांना साष्टांग नमस्कार केला. सरस्वतीही श्रीतुकारामचैतन्यांच्या पाया पडली त्यावर श्रीतुकारामचैतन्यांनी विचारले ” माय ! तुला काय पाहिजे ते तु माग ” त्यावर सरस्वतीने माझ्या पोटी श्रीमहाराजांसारखा पुत्र जन्मावा ही इच्छा व्यक्त केली. श्रीतुकारामचैतन्य श्रीमहाराजांकडे बघून हसले व त्यांनी सरस्वतीला तुझी इच्छा पूर्ण होईल असे सांगितले. गाव सोडल्या नंतर श्रीमहाराजांनी सरस्वतीला सांगितले कि ” श्रीतुकारामचैतन्य जगातील कोणतीही गोष्ट देवू शकतात परंतू ती अशाश्वत वस्तू मागून आपल्याला काय मिळेल. ” ” श्रीतुकारामचैतन्यांच्या कृपेने आपल्याला मुलगा होईल मात्र तो अल्पायुषी असेल ” यावर सरस्वती अत्यंत दु:खी झाली.
येहेळेगाव सोडल्यानंतर श्रीमहाराज नाशकास गेले.तेथे श्रीमहाराजांनी सरस्वतीस योगविद्या व साधना शिकविली. नाशिकात ते सहा महिने वास्तव्यास राहिले. नाशिक मध्येच श्रीमहाराजांचे कृष्णाजी त्रिंबक नावाचे शिष्य रहात असत. त्यांच्या वर सरस्वतीला नातेपुते येथे तिच्या बहिणीकडे पोहोचवण्यास सांगून श्रीमहाराज आयोध्येला गेले. कृष्णाजीपंतानीं गुरूपत्नीला मोठे आदरातिथ्य करून नातेपुते येथे नेवून घातले. त्यानंतर श्रीमहाराज नैमिष्यारण्यात काही दिवस राहून आयोध्येस गेले. श्रीरामाचे दर्शन घेवून दहा महिन्यांनी ते गोंदवल्यास परत आले.
// श्रीराम समर्थ //

॥ प्रतिक्रिया ॥